महात्मा गांधी मराठी माहिती | २ ऑक्टोबर
महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर सन १८६९ ला पोरबंदर येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. गांधीजींचे वडील एका संस्थानात मोठ्या अधिकारावर नोकरीला होते. पगार चांगला होता. मानमरातब मोठा होता. तरीसुद्धा त्यांची रहाणी साधी असे. सर्व लोकांशी ते मोकळेपणानं वागत असत.
गांधीजी थोडे मोठे झाले. शाळेत जाऊ लागले. चलाख बुद्धी व नियमित अभ्यास यामुळे त्यांचे भारतातील शिक्षण लवकर पुरं झालं. वडिलांची इच्छा, मुलानं इंग्लंडला जावं, तिथे उत्तम शिक्षण घ्यावं व शिक्षण पुरे करून भारतात परत यावं. जो आवडेल तो व्यवसाय करावा. लौकिक मिळवावा. गांधीजींना त्यांनी आपला विचार सांगितला. त्यांना तो पटला.
पण गांधीजींची आई, त्यांना इतक्या दूर पाठवायला तयार नव्हती. इतक्या दूर, आपल्या मुलावर नीट लक्ष कोण ठेवणार ? परदेशातील चालीरीती निराळ्या, आपल्या निराळ्या ! तिकडचे लोक मांस खातात – दारूही पितात. अशा लोकांच्या सहवासात मोहनला कोण आवरणार ? त्याला चांगली वाट कोण दाखवणार ?
आईच्या मनाची हुरहूर वाढत होती. काळजीनं मन अस्वस्थ होत होतं. पतीच्या विचाराला विरोध करायची भीती वाटत होती. मोहनवर तिचा सर्व जीव लागला होता. तिला काहीच सुचत नव्हतं !
मोहनच्या चाणाक्ष वृत्तीला आईच्या मनाची उलघाल कळली. एका सकाळीच मोहनची आंघोळ आटोपली. त्यानं कपडे केले. आईच्या पायावर डोकं ठेवून शपथ घेतली, “आई, मी मांस खाणार नाही. दारूला शिवणार नाही हे तुला आज सांगतोय ! मला शिकायला जायची परवानगी दे. तुझे आशीर्वादच मला नेहमी सोबत करतील. तेच माझं रक्षण करतील! नाही म्हणू नकोस ! सर्वांचा दयाळू परमेश्वर मला उत्तम यश देईल !”
आईनं मोहनला उठवलं. त्याच्या डोक्यावर आपले दोन्ही हात ठेवले. त्याला पोटाशी धरलं. हसतमुखानं त्याला इंग्लंडला जायची परवानगी दिली !
मोहन मनात सुखावला. पुढची सर्व व्यवस्था झाली. मोहन शिक्षणासाठी इंग्लंडला गेला !
मोहननं इंग्लंडच्या कॉलेजात नाव घातलं. तो मन लावून अभ्यास करी. प्रत्येक परीक्षेत उत्तम यश मिळवी. कॉलेजचं शिक्षण पुरं झालं. पुढे कायद्याच्या शिक्षणाला सुरुवात झाली. तिथेही उत्तम यश मिळवलं. सर्व शिक्षण संपवून मोहन भारतात परत आला.
भारतात आल्यावर वकिलीच्या व्यवसायाला सुरुवात केली.थोड्याच दिवसांत उत्तम जम बसला भरपूर पैसे मिळू लागले. वडिलांना समाधान वाटत होते. आईही आनंदी होती.
याच सुमारास आफ्रिकेत हिंदू व तेथील निग्रो यांच्यात खूप असंतोष वाढला होता. निग्रो लोक हिंदूंवर जुलूम करीत. त्यांना कामाचं वेतनही फार कमी देत. मालक या लोकांचा काहीच विचार करीत नसत. हिंदू लोक अगदी वैतागले होते.
या सर्व हकिगती वर्तमानपत्रातून दूरवर पसरत होत्या. गांधीजींनीही त्या वाचल्या होत्या. त्यांनी आपला वकिलीचा व्यवसाय थांबवला व ते त्या लोकांना मदत करण्यास आफ्रिकेत गेले. अनेक हिंदू लोकांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या सर्व तक्रारी ऐकून घेतल्या. त्यांच्या तक्रारी अगदी रास्त होत्या.
हिंदूंवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी सरकारकडे तक्रार केली. त्यांच्यासाठी ते कोर्टात दाद मागू लागले. सर्व हिंदूंसाठी वकील म्हणून तेच काम पाहत होते. कोर्टात गांधीजींच्या प्रयत्नांना यश मिळाले. लोकांना न्याय मिळाला. गांधीजींना बरं वाटलं.
काही दिवसांनी ते भारतात परत आले. लो. टिळकांचं नुकतंच निधन झालं होतं. टिळकांच्या प्रेरणेनं सारा देश स्वातंत्र्यप्राप्तीसाठी खडबडून जागा झाला होता. इंग्रज सरकारच्या दडपशाहीला पुरा विटला होता. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लोक वाटेल तो त्याग सहन करण्यास सिद्ध होते. स्वातंत्र्य मिळवणं हेच सर्वांचं ध्येय होतं. ते मिळाल्याशिवाय कुणालाच शांतता वाटणार नव्हती. गांधीजींनी हे सर्व पाहिलं. मनाशी पूर्ण विचार केला. भारताला स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे हा त्यांचाही निश्चय ठरला. तेही सर्व पुढा-यांत सहभागी झाले. इंग्रज सरकारच्या जुलमी सत्तेविरुद्ध बंड करून, त्यांना भारतातून हुसकावून लावण्याचा चंग बांधला. सर्वांचे पुढारी गांधीजी ! त्यांच्या विचारानं पुढची सर्व चक्रं चालू लागली !
१२ मार्च १९३० चा दिवस होता. गांधीजी साबरमतीच्या आश्रमात राहत होते. त्यांनी सत्याग्रह करण्याचा आपला निश्चय सरकारला कळवला. दांडी यात्रेच्या सत्याग्रहाचा हा दिवस कायम ठरला !
सरकारने मिठावर अन्याय्य कर बसवला होता. गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच या जुलमी वृत्तीचा संताप वाटत होता. या योजनेला सर्वांचाच विरोध होता. यासाठीच दांडीयात्रेचा कार्यक्रम जाहीर झाला होता. दांडी या गावी जाऊन समुद्रावरील मीठ घेऊन यायचं, हा विचार कृतीत आणण्यासाठी गांधीजोंबरोबर हजारो लोक या सत्याग्रहात सहभागी झाले होते.
हे सर्व सत्याग्रही गांधीजींबरोबर दांडी या गावी गेले. त्यांनी सरकारचा हुकूम मोडला. हातात मीठ घेऊन सरकारला आपला विरोध पटविला. सरकारने सर्वांना तुरुंगात टाकले. सर्व हसतमुखाने तुरुंगात गेले. तेथील जुलमांना त्यांनी जुमानलं नाही. हालअपेष्टांची पर्वा केली नाही. तरीसुद्धा सरकारची सत्ता व सरकारी बडगा यांच्या त्रासाचा अनुभव त्यांना घ्यावा लागत होताच !
दिवसामागून दिवस जात होते. सरकारशी झगडे चालू होते. अनेकांना तुरुंगात डांबून हाल सहन करावे लागत होते. पण या हालअपेष्टांची आता सर्वांना सवय झाली होती. काही लोक फासावर जाऊन मृत्युमुखी पडत होते. पण सर्वांची चिकाटी दांडगी होती ! .
सन १९४२ चं साल उजाडलं. तरुणांच्या मनात स्वातंत्र्याशिवाय कोणतेच विचार नव्हते. गांधीजींनी पुन्हा चळवळ सुरू केली. ‘चले जाव’ या घोषणेनं इंग्रज सरकारला भारतातून कायमचं पिटाळून लावण्याचा जोर वाढला. सरकारनं गोळीबारानं प्रतिकार केला. त्या गोळचा रणवीरांनी हसतमुखानं सोसल्या. त्यांच्या रक्तानं भारतभूमी न्हाऊन निघत होती. गोळीबारानं अनेकांचे देह भारतभूमीवर कोसळत होते. पण ‘माघार’ हा शब्दच कुठे दिसत नव्हता !
सरकारचे अघोरी उपाय थोडे मंदावले. इंग्लंडमधील मुत्सद्दी चर्चेसाठी भारतात आले. सायमन साहेबांनी भारतात पाऊल टाकलं ! सर्वप्रथम त्यांचा सत्कार झाला, तो ‘सायमनसाहेब परत जा’ या घोषणेनंच ! त्यांना हा पहिला हादरा बसला होता !
गांधीजी पंचा का वापरू लागले ?
गांधीजी एकदा एका समारंभाला आसाममध्ये गेले होते. गांधीजींचे भाषण ऐकण्यास अनेक लोक आले होते. पण त्यांतील अनेकांच्या अंगांवर पुरेसे कपडे नव्हते व जे होते तेही अगदी जीर्ण झालेले ! शिवाय त्या समुदायात स्त्रिया तर अगदीच हाताच्या बोटावर मोजाव्या इतक्याच ! गांधीजींनी नंतर चौकशी केली, तेव्हा कळलं, की, स्त्रियांना नेसायला अंगभर वस्त्रंही नसतात ! अशा स्थितीत त्या येणार कशा ?
गांधीजींचं मन कळवळलं ! आणि तेव्हापासून त्यांनीही आपल्या अंगावरची वस्त्रं उतरवली नि नेसायला फक्त एक पंचा व अंगावरही एक छोटं धोतर असा पोशाख ते नेहमी वापरू लागले. महान थंडी असो किंवा इंग्लंडसारख्या सुधारलेल्या देशात गाठी-भेटी घेण्याचा प्रसंग असो, त्यांच्या पोशाखात पुढे कधीच फरक पडला नाही. एकदा जो निश्चय ठरला असेल, त्यापासून ते एक रेसभरही ढळत नसत ! देशातील गोरगरिबांच्या स्थितीचा विचार करून आपणही त्याग सोसलाच पाहिजे हे त्यांचं व्रत होतं !
पुढे गोलमेज परिषद झाली. इंग्लंडमधील थोर मुत्सद्दी व भारतातील विचारवंत पुढारी यांत खूप चर्चा झाली. तरीही भारताच्या स्वातंत्र्याचा हट्ट महात्माजींनी कायम ठेवला होता ! सरकारची कोंडी सुटत नव्हती ! मोह आवरत नव्हता ! सत्ता सोडवत नव्हती. महात्माजींचं सत्याग्रही व्रत अभंग होते त्यांच्या सत्याग्रहापुढे कुणाचाच उपाय नव्हता ! त्यांचे सहकारी वल्लभभाई पटेल, पंडीत नेहरू, पं. दीनदयाळ, लालबहादूर शास्त्री हे व असे कित्येक, एक दिलानं सरकारी दडपशाहीचं जुलमी जोखड कायमचं झुगारून देण्यास पुढे सरसावले होते ! शेवटी इंग्रज सरकास नमले ! माघार घेण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग उरला नव्हता ! भारताच्या कणखर वृत्तीपुढे त्यांचा दुराग्रह दुबळा ठरला ! त्यांचे पाय लटपटू लागले. भारताच्या क्षितिजावर स्वातंत्र्याचे सोनेरी किरण पसरण्याचा सोनेरी दिवस उजाडला !
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला ! स्वातंत्र्यसूर्याचा तिरंगी ध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर डौलानं फडकू लागला !
भारत माता की जय !” या घोषणेनं भारताचा कानाकोपरा उत्साहानं आणि आनंदानं बहरून गेला होता.
१५ ऑगस्ट हा दिवस आपण दरवर्षी ‘स्वातंत्र्यदिन’ म्हणून मोठ्या आनंदानं साजरा करतो. ध्वजवंदन करून व थोर पुरुषांची भाषणं ऐकून सर्वांची मनं अभिमानानं भारावून जातात. हा दिवस ‘ राष्ट्रीय सण’ म्हणून घरोघर साजरा केला जातो.
लो. टिळकांनी दिलेला महामंत्र त्यांच्या निधनानंतर सर्व जनतेला त्यांच्या कार्याची सदैव साक्ष देत आहे, हे विसरता येणार नाही !
भारताला स्वातंत्र्य मिळालं. सर्वांना आनंद वाटला. महात्मा गांधीजींचं स्वप्न साकार झालं. त्यांच्या सहकान्यांचे श्रम कारणी लागले. पण हा स्वातंत्र्य सौख्याचा आनंद दीर्घकाल पाहण्याचं भाग्य गांधीजींना फार काळ लाभलं नाही. ३० जानेवारी १९४८ ला त्यांनी सर्व जनतेचा व भारतमातेचा अखेरचा निरोप घेतला. तरीही गांधीजींची आठवण भारतीय जनता कधीच विसरणार नाही !