राज्यातील सर्व शाळांमध्ये इ. १ ली ते ९ वी वार्षिक परीक्षा एकाच वेळी आयोजित करण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय
शालेय शिक्षणाच्या दर्जात सातत्य ठेवण्यासाठी व शिक्षणाच्या एकसंधतेसाठी महाराष्ट्र शासनाने इयत्ता १ ली ते ९ वीच्या वार्षिक परीक्षा, संकलित मूल्यमापन (SAT) आणि PAT चाचणींचे एकाच वेळी आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यभरातील सर्व शाळांमध्ये समान वेळापत्रकानुसार परीक्षा पार पडतील.
वार्षिक परीक्षांच्या वेळापत्रकाची आवश्यकता
मार्च व एप्रिल महिन्यातील परीक्षांचे आयोजन शाळास्तरावर वेगवेगळ्या तारखांना केले जात असे. यामुळे काही शाळांमध्ये परीक्षा लवकर होत, तर काही शाळांमध्ये उशिरा. परिणामी, विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी असलेला कालावधी कमी पडत असे. यावर उपाय म्हणून राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी एकसंध वेळापत्रक जाहीर केले आहे.
या निर्णयाचे महत्त्व व फायदे
- सर्व शाळांमध्ये एकसमान परीक्षा कालावधी: परीक्षा एकाच वेळी घेतल्याने सर्व शाळांमध्ये अध्ययन व मूल्यमापनाची समानता राखली जाईल.
- विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये वाढ: परीक्षा झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांचा शाळेतील सहभाग कमी होतो. नवीन वेळापत्रकामुळे विद्यार्थी अंतिम दिवसांपर्यंत उपस्थित राहतील.
- शैक्षणिक वर्षाचे अधिक चांगले नियोजन: वार्षिक परीक्षांचा कालावधी ठरवून घेतल्याने शिक्षकांना शैक्षणिक नियोजन चांगल्या पद्धतीने करता येईल.
- पुनरावलोकनासाठी अधिक वेळ: परीक्षा ठराविक कालावधीत होणार असल्याने विद्यार्थ्यांना पुनरावलोकनासाठी अधिक वेळ मिळेल, ज्यामुळे त्यांचा अभ्यास अधिक प्रभावी होईल.
नवीन वेळापत्रक आणि त्याचे पालन
सर्व शाळांनी नवीन वेळापत्रकानुसार परीक्षा घ्याव्यात, तसेच विद्यार्थ्यांना वेळेत सर्व अभ्यासक्रम पूर्ण करता यावा यासाठी आवश्यक त्या सूचना द्याव्यात. या वेळापत्रकाचे पालन न करणाऱ्या शाळांवर आवश्यक ती कारवाई केली जाऊ शकते.
वार्षिक परीक्षा वेळापत्रक

स्थानिक परिस्थितीनुसार बदल करता येईल का?
विशेष परिस्थितीत, जसे की नैसर्गिक आपत्ती, सार्वजनिक परीक्षा केंद्रांचा अभाव, किंवा इतर महत्त्वाच्या कारणांसाठी, शिक्षणाधिकारी आणि शाळा व्यवस्थापनाने संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आवश्यक बदल करू शकतात.
पालक व शिक्षकांनी काय भूमिका बजवावी?
- पालकांनी आपल्या मुलांना वेळेवर परीक्षेसाठी तयार राहण्यास प्रवृत्त करावे.
- शिक्षकांनी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करावे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन द्यावे.
- विद्यार्थ्यांनी परीक्षा वेळापत्रकानुसार त्यांचा अभ्यास नियमितपणे करावा आणि पुनरावलोकनावर भर द्यावा.
शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पाऊल
हा निर्णय महाराष्ट्रातील शालेय शिक्षण प्रणालीत एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. एकत्रित परीक्षांच्या नियोजनामुळे विद्यार्थ्यांना एकसंध शिक्षणाचा लाभ मिळेल, तसेच शैक्षणिक व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल.
इ. १ ली ते ९ वी वार्षिक परीक्षा परिपत्रक
राज्यातील सर्व शाळांमध्ये इ. १ ली ते ९ वी इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा / संकलित मूल्यमापन / PAT चाचण्यांचे आयोजन एकाच वेळी करणेबाबत
सर्वसाधारण सूचना:
१) संकलित मूल्यमापन – २ साठी परीक्षांचे आयोजन शाळा स्तरावरुन करण्यात येईल तथापि त्यांसाठी यासोबत दिलेल्या वेळापत्रकाचा वापर करण्यात यावा.
२) शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांना PAT अंतर्गत इयत्ता ३ री ते ९ वी साठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांसाठी संकलित मूल्यमापन- २ च्या प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयाकडून पुरविण्यात येतील. इतर व्यवस्थापनाच्या शाळांना सर्व प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करावयाच्या आहेत.
३) इयत्ता १ ली व २ री साठी सर्व विषयांच्या व इ. ३ री ते ९ वी अन्य विषयांच्या संकलित चाचणी – २ / लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर विकसित करून प्रचलित पद्धतीनुसार मूल्यमापन करावे.
४) इयत्ता ९ वी साठी PAT शिवाय अन्य विषयांसाठी वेळापत्रक यासोबत देण्यात आलेले नाही ते शाळास्तरावरून ठरविण्यात यावे.
५) वेळापत्रकात नमूद न केलेल्या (कलाशिक्षण, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, इत्यादी) श्रेणी विषयांच्या मूल्यमापनाचे नियोजन शाळास्तरावर करण्यात यावे.
६) शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांना PAT अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांचा वापर करूनच त्या विषयाची संकलित चाचणी – २ घ्यावयाची आहे. इतर विषयांसाठी शाळास्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून संकलित चाचणी – २ घेण्यात यावी.
७) तथापि, इयत्ता ५ वी व ८ वी वर्गांसाठी वार्षिक परीक्षा शासन निर्णय दि. ०७/१२/२०२३ मधील तरतूदीनुसार स्वतंत्रपणे शाळांनी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका स्वत: तयार करून घ्यावयाची आहे. PAT- ३ अंतर्गत दिलेल्या प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षा म्हणून वापरता येणार नाही.टीप- इ. ५ वी व इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांना प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांसाठी दोन प्रश्नपत्रिका सोडावाव्या लागतील. त्यानुसार नियोजन करावे. इयत्ता पाचवी व आठवी वगळता अन्य इयत्तांकरिता कोणत्याही विषयांची दुबार परीक्षा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
८) शाळेच्या स्थानिक वेळेनुसार (सकाळ सत्र / दुपार सत्र) परीक्षेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य शाळांना राहील. तथापि यासोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार त्या विषयाची परीक्षा त्याच तारखेस हईल याची दक्षता घ्यावी.
९) तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा त्या- त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर घेण्यात यावी. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी अथवा उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.
१०) संकलित चाचणी – २ च्या कालावधीत शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी त्या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी.
११) राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांचा निकाल महाराष्ट्र दिन ध्वजारोहनानंतर दि. ०१/०५/२०२५ रोजी जाहीर करण्यात यावा. याचबरोबर ०२ मे २०२५ पासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी सुरु होईल.
१२) सदर सूचना राज्यमंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळाच्या शाळांना लागू असणार नाहीत.संकलित चाचणी- २ आयोजनाची जबाबदारी जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांची असेल. त्यांनी सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी.उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व नमूद इयत्तांची चाचणी होईल याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. तथापि, अपवादात्मक किंवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काही बदल करायचे असल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांची परवानगी घेवूनच वेळापत्रकात बदल करावा.