सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी शालेय शिक्षण विभागाच्या दिशादर्शिकेचे प्रकाशन
शालेय शिक्षण विभागातील कार्यालयांच्या कामकाजाची वार्षिक रूपरेषा ठरवणाऱ्या आणि या विभागाला दिशा देणाऱ्या शैक्षणिक कॅलेंडर म्हणजे दिशादर्शिकेचे प्रकाशन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे हस्ते बुधवारी करण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या दिशादर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
प्रधान सचिव रनजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ही दिशादर्शिका तयार करण्यासाठी शिक्षण संचालक (योजना) डॉ. महेश पालकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.
मागील वर्षापासून अशी दिशादर्शिका प्रकाशित करण्यात येत आहे. वर्षभरातील शैक्षणिक कामकाजाचे नियोजन दिशादर्शिकेत करण्यात आल्याचे शिक्षण आयुक्त श्री. मांढरे यांनी यावेळी सांगितले. दिशादर्शिकेमुळे शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आल्याचे प्रधान सचिव श्री. देओल यांनी सांगितले.
ही दिशादर्शिका शालेय शिक्षण विभागास उपयोगी ठरत असल्याचे सांगून शिक्षण मंत्री श्री.केसरकर यांनी समाधान व्यक्त केले. दिशादर्शिकेशिवाय टेबल प्लॅनर (मेज नियोजक)चेही प्रकाशन करण्यात यावेळी करण्यात आले.
दिशादर्शिकेची वैशिष्ट्ये
शालेय शिक्षण विभागातील कार्यक्रम, योजना, विषय आणि सर्व प्रकारचे कार्यालयीन कामकाज अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षण आयुक्तालय, प्राथमिक शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, योजना शिक्षण संचालनालय, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व योजना यांच्या संपूर्ण वर्षाच्या कामकाजाचे नियोजन यात आहे. क्षेत्रभेटी वेळी एकाच शैक्षणिक विभागात एकाच वेळी दोन वरिष्ठ अधिकारी त्या आठवड्यात जाणार नाहीत, असे नियोजन केले आहे. राज्यस्तरीय अधिकारी क्षेत्र भेटीस गेल्यास सर्व संचालनालयाकडील कामकाजाचा आढावा घेणे अपेक्षित आहे.
दर सोमवारी कार्यालयीन साप्ताहिक बैठका, पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी क्षेत्रीय अधिकारी आपल्या अधिनस्त कार्यालयांचा व्हीसीद्वारे आढावा घेणार तर राज्यस्तरीय कार्यालये दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी क्षेत्रीय कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेणार. दिशादर्शिकेत शासन निर्णयानुसार शासकीय सुट्ट्या व घोषित कार्यक्रम (जयंती) यांचा समावेश. दिशादर्शिकेत हॅश चिन्हाने दर्शविलेले कामकाज सर्व कार्यालयांनी त्या दिवशी करणे अपेक्षित आहे. काही महत्त्वाच्या योजनांची माहिती तसेच बैठका व दौरे प्रभावी होण्याबाबत द्यावयाच्या सूचनांचा समावेश दिशादर्शिकेत करण्यात आला आहे. बालभारती, विद्या प्राधिकरण, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, राज्य परीक्षा परिषद यांची स्वतंत्र दिशादर्शिका तयार करण्यात आली आहे.